आम्ही त्याकाळीं बागलकोट इथे रहात होतो. गावांत सगळीकडे वीज होती असं नाहीं. आमच्या घरीं वीज नसे. अंधार पडला की कंदिलाच्या उजेडांत सगळी कामं होत. घराबाहेर मिट्ट काळोख असे. मी त्यावेळी 7/8 वर्षांचा होतो. सर्वसाधारण या वयांत लहान मुलांना अंधाराची भीति वाटते. मलाही तशीच भीति वाटायची. अंधाराच्या भीतिने मी माझ्या आईच्या जवळ झोपायचा हट्ट करीत असे. मी शेंडेफळ म्हणून माझे सर्व हट्ट पुरवले जात असत. एके दिवशी सगळीं कामं उरकून आई कंदिलाच्या उजेडांत जेवायला बसली होती. आधीच खूप उशीर झाला होता. माझी इतर भावंडं आधीच झोपायला गेली होती. पण मी मात्र माझ्या आईची वाट पहात होतो. तिचं जेवण झाल्यावर तिला इतर कामंही असत. आवराआवर करायची आणि उष्टी खरकटी काढायची -एक ना दोन. मला मात्र घाई झाली. मी आईला लवकर जेवून घ्यायला सांगूं लागलो.
'कां रे? तूं जाऊन झोप नां?' आई.
'मला भीति वाटते' मी
'कशीची?'
'अंधाराचीं'
आईने भिंतीवरल्या श्रीरामाच्या फोटोकडे बोट दाखवून मला सांगितलं,
'ज्या वेळी मी तुझ्याबरोबर नसेन नां, त्यावेळी तू ह्या फोटोतल्या रामाची आठवण कर, तुझी भीति निघून जाईल'
त्यानंतर आजपर्यंत मला कधीच भीति वाटली नाहीं ! कारण मला माझ्या आईमध्ये श्रीराम आणि श्रीरामच्या प्रतीमेंत माझी आई असं दिसायला लागलं.
कधीतरी-कुठेतरी ऐकलेली ओळ " ऐ माँ ! तेरी सूरतसे अलग भगवानकी सरत क्या होगी?"

लोड होत आहे...
प्रतिसाद